निसर्गाला पुन्हा वाचवायला हवं…


दुष्काळ दुष्काळ म्हणजे…
नक्की काय असतं ग आई… ?
पुस्तकातल्या एवढ्याशा धड्यात…
खास काही समजलच नाही…

काय उत्तर द्याव यावर…
आईला क्षणभर काहीच सुचेनासं झालं….
नकळत आईच्या डोळ्यांत…
टचकन पाणी आलं….

तरीही उत्तर दिलं…
बाळ… दुष्काळ म्हणजे खरतर…
शेतकऱ्याच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण…
करपून जात नशीब ज्याचं…
दुष्काळाचे चटके करताना सहन….

नदीच्या प्रत्येक थेंबासोबत…
शेतकऱ्याच रक्तही आटतं…
रखरखणार मोकळ आभाळ…
पोराबाळांच्या डोळ्यांत दाटतं…

भेगाळलेली कोरडी जमीन…
नजर जाईल तिथवर पसरलेली….
वर्षानुवर्ष वाट पाहणारी म्हातारी आजी….
सुख काय असतं… नेमकं हेच विसरलेली….

अगदी थेंबभर पाण्यासाठी…
तरसणारी एक एक घागर…
कवा पावल माहित नाही तरीही….
देवीला न चुकता घातलेला कोरडाच जागर….

छातीवर दगड ठेऊन…
रोजच कोंड्याची भाकर थापणारी आई…
दुधापायी गेलेल्या वासरासाठी…
गोठ्यात हंबरडा फोडणाऱ्या गाई…

पावसाच्या एका थेंबासाठी तरसणारा…
काळ्या मातीचा कण अन कण…
रोज नव्या कर्जात बुडून…
आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोचलेलं शेतकऱ्याच मन….

वर फाटक आभाळ…
अन पायाखाली कोरडी धरणी…
असाच काहीसा असतो हा दुष्काळ…
आपलाच गुन्हा… का बर म्हणावी हि देवाची करणी…?

आई… थांबवता नाही का येणार हे…
आपल्या लाडक्या बाप्पाला सांगून…?
बाळा… तोही आता थकलाय रे…
आपली रोजची गार्हाणी ऐकून…

थांबवायचं असेल हे सगळ….
तर आपणच पाऊल उचलायला हवं…
त्यांचं दुखं आणि आपलं सुख…
थोड थोड वाटून घ्यायला हवं…
कण कण साठवून अन थेंब थेंब जिरवून….
या निसर्गाला पुन्हा वाचवायला हवं…
🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

Race with own

मन